Friday, 14 August 2020

भाऊसाहेबांच्या कृषक क्रांतीचे साक्षीदार कृषितज्ञ पद्मविभूषण प्रो.एम.एस. स्वामिनाथन यांची मुलाखत

 

भाऊसाहेबांच्या कृषक क्रांतीचे साक्षीदार कृषितज्ञ पद्मविभूषण प्रो.एम.एस. स्वामिनाथन यांची मुलाखत

डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे सोबत काम केलेले जागतिक कीर्तीचे कृषितज्ञ पद्मविभूषण प्रो.एम.एस. स्वामिनाथन यांची मुलाखत घेण्याची  संधी श्री शिवाजी संस्थ्येचे अध्यक्ष मा.हर्षवर्धन देशमुख व संस्था कार्यकारिणी यांचे प्रोत्साहनामुळे मिळाली. दि.२२ नोव्हेंबर २०१८ ला चेन्नई येथे डॉ.एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फौंडेशन  येथे त्यांची मुलाखत घेण्यात आली. ९३ वर्षीय प्रो.एम.एस. स्वामिनाथन सकाळी १० वाजता त्यांच्या कार्यालयाला आले व डॉ.पंजाबराव देशमुख यांचे विषयी अतिशय आदर,सन्मान व सोबत काम केल्याचा अभिमान त्यांच्या उत्साहावरून व बोलण्यावरून जाणवत होता.देशातील शेतकऱ्यांचा आवाज असलेल्या डॉ.स्वामिनाथन आयोगाबद्दल सर्वांना माहिती आहे परंतु भारतीय कृषक क्रांतीचे शिल्पकार डॉ.पंजाबराव देशमुख यांचे सोबत त्यांनी केलेले कार्य, त्यांनी अनुभवलेले भाऊसाहेब व भाउसाहेबांची कृषक क्रांती समजून घेण्याच्या दृष्टीने सदर मुलाखत घेण्यात आली.

डॉ.एम.एस.स्वामिनाथन : डॉ. पंजाबराव देशमुख यांचे सोबत काम केल्याचे व त्याबाबत मत व्यक्त करतांना मला आनंद होत आहे .आपल्या देशाला पीएल 480   धान्यावर अवलंबून राहावे लागले .परंतु आज जगामध्ये फार कमी देशांमध्ये अन्नसुरक्षा अधिकार कायदेशीर जनतेला मिळाला त्यापैकी आपला देश एक आहे. हा बदल करण्याच्या संदर्भात डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी पाया उभारणी केली. डॉ. पंजाबराव देशमुख हे कृषी क्रांतीचे दूत होते.

त्यावेळी भारतीय कृषी संशोधन केंद्राच्या पुसा इन्स्टिट्यूट येथे गहु संशोधन केंद्राचा कार्यभार माझ्याकडे होता.डॉ.पंजाबराव देशमुख पुसा इन्स्टिट्यूट लायायचे.कारण त्यांचा विश्वास होता कि विज्ञान हे परिवर्तनाचे साधन आहे.त्यांना माहिती होते कि वैज्ञानिक संशोधनामुळे ग्रामीण भारताचा विकास होवू शकतो.ते म्हणायचे आपण फक्त प्रयोगशाळेमध्ये बसून चालाणार नाही तर वैज्ञानिक तंत्र प्रत्यक्ष शेती मध्ये परावर्तीत केले पाहिजे.

डॉ.पंजाबराव देशमुख भारताचे कृषी इतिहासामध्ये योग्य वेळी कृषिमंत्री झाले.त्यावेळेस शेती क्षेत्रासमोर खूप मोठी आव्हाने होती.त्यावेळी डॉ.राजेंद्र प्रसाद ,के.एम.मुन्शी जमीन संवर्धन व विकास याबाबत काम करीत होते.डॉ. पंजाबराव देशमुख यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा त्यांना नवीन कल्पना सुचली तेव्हा ते राज्यातील सरकारांना व मंत्र्यांना पत्र लिहायचे ती पत्रे खूपच प्रसिद्ध होते त्यांना माहिती होते की राज्य सरकारच्या पुढाकाराशिवाय शेतीची प्रगती होऊ शकत नाही म्हणून ते राज्य सरकारांना पत्र लिहायचे व त्या पत्रांचा बहुतेक वेळा मसुदा माझ्याकडे पाठवायचे

जेव्हा मी त्यांच्याकडे जायचो व दरवाजावर परवानगी घेऊन आत जायचं तेव्हा ते म्हणायचे तुम्हाला परवानगीची गरज नाही तुम्ही माझेच फायद्याचे काम करतात भाऊसाहेब अगदी अनौपचारिक पद्धतीने वागायचे.

डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अनेक संस्था स्थापित केल्या.ते संस्था निर्माते होते.त्यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली

जेव्हा ते एकदा भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या वैज्ञानिक संग्रहालयामध्ये चर्चा करीत होते.तेव्हा ते म्हणाले “जगामध्ये प्रचंड ज्ञान आहे त्याचा उपयोग आपल्या देशाला झाला पाहिजे त्याकरिता आपण जागतिक कृषी प्रदर्शन आयोजित करू व आपले अनुभव सुद्धा  जगाला सांगू”.या पद्धतीनेजागतिक कृषी प्रदर्शनाच्या आयोजनाचा निर्णय झाला.त्यावेळचे अमेरिकेचे अध्यक्ष आयसेन हावर जागतिक कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला आले होते.

मला विशेषत्वाने सांगावयाचे वाटते की दिल्लीमध्ये प्रथमच यानिमित्ताने प्रगती मैदान विकसित करण्यात आले. प्रगती मैदानाच्या विकासाची कल्पनाच डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची होती.

नंतर प्रश्न आला की जागतिक कृषी प्रदर्शनाचा भर कशावर असावा.डॉक्टर पंजाबराव देशमुख म्हणाले “नवीन तंत्रज्ञान”.कृषी क्षेत्रामध्ये अणुऊर्जेचा वापर यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्याकरिता जपानी तंत्रज्ञानाचा वापर करून भव्य इमारत बांधण्यात आली.अणुऊर्जेचा वापर शेती क्षेत्रामध्ये तीन प्रकारे करता येतो.एक पिकांच्या नवीन प्रजाती विकसित करणे. म्यूटेशन या विषयावर मी करंट सायन्स या नियतकालिकामध्ये म्युटेशन मध्ये किरणोत्सर्गाचा वापर यावर लेख लिहिला.

त्यावेळेला डॉ.होमी जहांगीर भाभा हे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते. त्यांच्याकडे आम्ही दोघे गेलो डॉ.होमी जहांगीर भाभा यांना या प्रयोगाबद्दल  समजून सांगण्याची जबाबदारी डॉ.पंजाबराव देशमुखांनी माझ्यावर सोपवली.डॉ.होमी भाभा यांनी डॉ.पंजाबराव देशमुखांनबद्दल गौरवोद्गार काढले.ते म्हणाले मंत्री महोदयांना शेतीबद्दल प्रचंड आस्था व ज्ञान आहे.त्यांनी जागतिक कृषी प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल कौतुक केले

 

शेतीच्या प्रश्नाबद्दल डॉ.पंजाबराव देशमुख राज्य सरकार यांना पत्र लिहीत.दुर्दैवाने आज महाराष्ट्र व केरळमध्ये दुष्काळाची स्थिती आहे.डॉ.पंजाबराव देशमुखांनी आमच्याकडे दुष्काळ आहे असे सांगितले नाही तर भविष्यातील दुष्काळाच्या संकटावर मात करण्याची तयारी त्यांनी केली.आज दुर्दैवाने राजकीय पक्ष दुष्काळासाठी एकमेकाला जबाबदार धरतात.दुष्काळ ही वस्तुस्थिती आहे व त्यावर मात करणे हे गरजेचे आहे.

डॉ.पंजाबराव देशमुख हे शिक्षण तज्ञ होते,वैज्ञानिक होते,धोरणकर्ते होते,राजकीय नेते आणि दूरदृष्टीचे नेतृत्व होते.

 

कृषी क्षेत्रातील स्वावलंबन हे डॉ.पंजाबराव देशमुख यांचे महत्त्वाचे योगदान आहे. हे लोकांच्या लक्षात येत नाही.दुग्ध उत्पादनाला सुद्धा त्यांनी प्राधान्य दिले.आपण आज जगामध्ये दुग्ध उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. हे डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या दूरदृष्टीने शक्य झाले.

ते नेहमी म्हणायचे की देशातील शेतकरी फक्त पीक व पशुधनावर अवलंबून आहे.फक्त पिक किवा फक्तपशुधनावर अवलंबून न राहता त्याचा संयुक्त वापर शेती क्षेत्रामध्ये झाला पाहिजे. डॉ.पंजाबराव देशमुख सोबत काम केल्याचे नमूद करताना मला आनंद होत आहे.आम्ही जेव्हा परवानगी घेऊन त्यांच्या कार्यालयात प्रवेश करत असू तेव्हा ते म्हणायचे तुम्हाला परवानगीची गरज नाही.तुम्ही मला केव्हाही भेटू शकता कारण हे तुम्ही तयार केलेली संस्था आहे.

प्रश्न : सर,कृषी शास्त्रज्ञ म्हणून शेतीचे आधुनिकीकरण,अन्नसुरक्षितता व लक्षावधी लोकांना अन्न या डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या दृष्टीचे व कार्याचे मूल्यमापन आपण कसे करता?

 

डॉ.एम.एस.स्वामिनाथन : डॉ.पंजाबराव देशमुख यांनी स्थायी अन्नसुरक्षेचा पाया घातला.1944 साले मी कोईम्बतूरच्या महाविद्यालयात गेलो.तेव्हाआपण अन्नधान्याच्या बाबतीत खराब स्थितीमध्ये होतो.भुकमरी आणि कुपोषणाचे प्रश्न होते.डॉ.पंजाबराव देशमुखांनी भुकमरी व कुपोषण संपवण्याचे प्रयत्न केले.म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख हे भारताच्या अन्नसुरक्षितता नियोजनाचे निर्माते ठरतात.

आपण त्यांनी केलेल्या कार्याला,योगदानाला पुरेसा सन्मान देऊ शकलो नाही.लाखो शेतकरी त्यांची पूजा करतात.त्यांचा विश्वास होता की फक्त दिल्लीच्या कृषी भवनात बसून शेतकऱ्यांचा विकास होऊ शकत नाही.त्याकरिता शेतावर जाऊन आपण शेतकऱ्यांशी संवाद साधला पाहिजे.

 

आज मी वृत्तपत्रांमध्ये  वाचले की मुंबईमध्ये वीस हजार शेतकऱ्यांनी निदर्शने केली.आज समग्र शेतीविकासाचे धोरण राबविले पाहिजे.आम्ही राष्ट्रीय कृषी  आयोगाच्या अहवालामध्ये नमूद केलेले आहे. तीन सूत्र आम्ही मांडले.कृषी मालाची किंमत,कृषी मालाची खरेदी व सार्वजनिक वितरण.कृषी मालाची किंमत उत्पादन  खर्चाचा 50 टक्के अधिक असली पाहिजे.जास्तीत जास्तशेतमालाची खरेदी केली पाहिजेव शेतमालाची निर्यात केली पाहिजे.अन्नसुरक्षा कायद्यान्वये प्रति व्यक्ती पाच किलो धान्य निर्धारित केले आहे त्याकरिता सार्वजनिक वितरण व्यवस्था केली पाहिजे.

 

डॉ.पंजाबराव देशमुखांनी फलोत्पादनावर भर दिला;कारण फलोत्पादनामुळे पोषण सुरक्षितता मिळते.पिक उत्पादन,पशुधन,पशूपालन व मासेमारी या चारही विभागांवर भर दिला.त्यामध्ये पिक उत्पादन,पशूपालन, मासेमारी व फॉरेस्ट्री चे महत्व पर्यावरण दृष्टिकोनातून संतुलित ठेवते.

प्रश्न: आपल्या देशामध्ये कुपोषण,भुख व अन्नाचा तुटवडा यासारखे प्रश्न आहेत.डॉ.पंजाबराव देशमुखांनी यासंदर्भात केलेल्या कार्याचे मूल्यमापन आपण कसे करता.

 

डॉ.एम.एस.स्वामिनाथन : मी नेहमीच म्हणतो के आपल्या देशामध्ये उंच पर्वत व लक्षावधी लोक उपाशी आहे.मोठ्या प्रमाणामध्ये लोकांकडे अन्न विकत घेण्याची आर्थिक ताकत नाही.पुरेशा अन्नाची उपलब्धता जे अन्न उत्पादनामुळे शक्य आहे,  अन्नाची प्राप्त होण्याची शक्यता क्रयशक्तीवर अवलंबून आहेव अन्नाची शरीरामध्ये प्रक्रिया पिण्याच्या पाण्यावर अवलंबून आहे,त्यामुळे अन्न सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अन्नाची उपलब्धता, प्राप्ती   व पचन महत्त्वाचे आहे.

डॉ.पंजाबराव देशमुखांनी भुकमरी व कुपोषण संपवण्याचे प्रयत्न केले.म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख हे भारताच्या अन्नसुरक्षितता नियोजनाचे निर्माते ठरतात.

प्रश्न: कृषी शिक्षण संशोधन व विकास यामध्ये डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या दृष्टिकोन व कार्याकडे आपण कसे बघता.

डॉ.एम.एस.स्वामिनाथन : डॉ.पंजाबराव देशमुख यांचा कृषी शिक्षण व संशोधनाबाबत दृष्टिकोन व्यापक होता.फक्त शिक्षण हे उच्च स्तरावर देऊन भागणार नाही तर ते प्राथमिक स्तरावर सुद्धा दिले पाहिजे,कारण शिक्षणामुळे तंत्रज्ञान आत्मसात करण्यास मदत होते असे डॉ.पंजाबराव देशमुख यांना वाटत होते.त्यांचा दृष्टिकोन सर्वांत व्यापक होता.

प्रश्न : 1959 मध्ये डॉ.पंजाबराव देशमुखांनी पहिले जागतिक कृषी प्रदर्शन आयोजित केले.या कृषी प्रदर्शनाचा भारतीय कृषी क्षेत्रावर काय परिणाम झाला?

डॉ.एम.एस.स्वामिनाथन :यापूर्वी मी चर्चा केल्याप्रमाणे जागतिक कृषी प्रदर्शनाला अमेरिकेचे अध्यक्ष आयसेन हॉवर रशियाचे अध्यक्ष निकिता  कृश्चव्ह, डॉ.राजेंद्र प्रसाद व पंडित जवाहरलाल नेहरू इ.राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या.कृषी प्रदर्शनाला फक्त जागतिक राजकीय नेत्यांनीच भेटी दिल्या नाही तर जागतिक वैज्ञानिकांची सुद्धा ती परिषद होती.तिथे फक्त कृषी प्रदर्शन नव्हते तर वैज्ञानिक चर्चासत्र सुद्धा आयोजित केले होते.

जागतिक कृषी प्रदर्शनामध्ये कृषी क्षेत्रामध्ये अणुऊर्जेचा वापर,कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा विकास  यामुळे भारतीय कृषी क्षेत्राला प्रतिष्ठा मिळाली.डॉ.पंजाबराव देशमुखांनी जागतिक कृषी प्रदर्शनाकरिता उत्कृष्ट इमारत बांधली.त्याकरिता अमेरिकन तंत्रज्ञान वापरले.लोकांना असे वाटते की कृषी क्षेत्र म्हणजे गरीब किसान.त्यांना कमी महत्त्व दिले जाते.डॉ.पंजाबराव देशमुख म्हणायचे की मला कृषी क्षेत्राला प्रतिष्ठा द्यायची आहे व त्यांनी कृषी क्षेत्राला नवीन चेहरा दिला.

प्रश्न :  शेतीकरीता वित्तपुरवठा व शेतमालाचे विपणन हे दोन्ही प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न डॉ.पंजाबराव देशमुखांनी केले या प्रश्नाकडे आपण कसे पाहता?

डॉ.एम.एस.स्वामिनाथन : शेतीकरीता वित्तपुरवठा व शेतमालाचे विपणन या दोन्ही गोष्टी दुर्लक्षित आहे. मार्केट आणि मान्सून हे दोन्ही घटक शेतकऱ्यांचे जीवनमान ठरवते.मान्सूनचा लहरीपणा व मार्केटची अस्थिरता  शेतकऱ्यांसाठी घातक आहे.डॉ.पंजाबराव देशमुखांना शेतकरीकेंद्रित बाजारपेठ हवी होती.त्याकरिता त्यांनी प्रयत्न केले. ग्राहक केंद्रबाजारपेठ असावी पणत्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे.जर सरकारने डॉ. पंजाबराव देशमुखांनचे धोरण स्वीकारले  असते तर शेतकऱ्यांना निदर्शने करण्याची वेळ आली नसती. जेव्हा शेतकऱ्यांना निदर्शने करावी लागतात तेव्हा मला दुःख होते.डॉ.पंजाबराव देशमुख यांचे ज्ञान,अनुभव व कार्य आपण का स्वीकारत नाही?

प्रश्न: सर डॉ.पंजाबराव देशमुखांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली व इतर कृषिविषयक संस्था व संघटना स्थापन केल्या.जसे ऑल इंडिया नॉन एडीबल इंडस्ट्रीज असोसिएशन, यंग फार्मर्स असोसिएशन, अखिल भारतीय ताडगूळ महासंघ, या संघटनांचे शेतकऱ्यांच्या विकासामध्ये योगदान काय?

डॉ.एम.एस.स्वामिनाथन : डॉ.पंजाबराव देशमुख यांनी कृषी संघटना व संस्थांमध्ये चांगल्या व्यक्तींची निवड केली.संघटना व संस्थेचे यश हे त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनावर असते व संस्था शेतकरी केंद्रीय विचारावर चालते.जर हा दृष्टिकोन कमकुवत झाला किंवा सोडला तर त्याचा प्रभाव कमी होतो.हे आज आपल्याला दिसून येत आहे.डॉ.पंजाबराव देशमुख यांना त्याची कल्पना होती.आज बहुतेक शेतकरी संघटना ह्या कृषी तंत्रज्ञानापेक्षा राजकीय जास्त झाले आहेत.डॉ.पंजाबराव देशमुखांनी संघटनेला राजकीय महत्व एवढेच वैज्ञानिक व तंत्रज्ञानाला महत्त्व दिले.

प्रश्न: सर डॉ.पंजाबराव देशमुख यांनी आंतरराष्ट्रीय संघटनांवर कार्य केले फुड एन्ड अग्रिकल्चर ऑर्गनायझेशन,वर्ल्ड  फॉरेस्ट काँग्रेस, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एग्रीकल्चर प्रोडूसर, आणिमिल्सफोर मिलेनियम.आपण या कार्याचे कसे मूल्यमापन  करता?

 डॉ.एम.एस.स्वामिनाथन : मी त्यावेळेला तरुण संशोधक म्हणून  कार्य करीत होतो.जेव्हा डॉ.पंजाबराव देशमुख विदेशामध्ये जायचे तेव्हा ते परत आल्यानंतर त्यांचे अनुभव व निरीक्षण सांगायचे.डॉ.पंजाबराव देशमुख यांचे आंतरराष्ट्रीय सहकार्यावर विश्वास होता,त्यांनी भारतात कृषी विद्यापीठाची पायाभरणी केली.पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांनी कृषी विद्यापीठाबद्दल कल्पना दिली.

प्रश्न: आपण हरित क्रांतीचे जनक आहात व डॉ.पंजाबराव देशमुख यांचे कार्याचे वारसदार आहात. आपल्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या “राष्ट्रीय कृषी आयोगाच्या अहवालाची अमलबजावणी मुळे शेतकऱ्याचे कल्याण होणार का?

डॉ.एम.एस.स्वामिनाथन : देशाच्या इतिहासामध्ये प्रथमच शेतकऱ्यांसाठी कृषी आयोगाचे गठन झाले.त्यामुळे राष्ट्रीय कृषी आयोग शेतकऱ्यांचा आवाज आहे.आम्ही विदर्भामध्ये शेतकर्यांसोबत संवाद साधला.डॉ.पंजाबराव देशमुखांचा सुद्धा हाच दृष्टीकोण होता.आपण शेतकऱ्यांचे म्हणणे एकूण धोरण ठरविले पाहिजे.त्याकरिता आम्ही सर्व जण शेतकऱ्यांच्या स्थायी विकासाच्या दृष्टीकोनातून राष्ट्रीय कृषी आयोगाचे काम करीत होतो.

 

दुर्दैवाने राष्ट्रीय कृषी धोरण न ठरविता क्षणिक कर्जमाफीचा उपाय सरकार स्वीकारतात. तो आवश्यक आहे  पण तो दीर्घ काळ साठी टिकणारा उपाय नाही.आपण डॉ.पंजाबराव देशमुख यांचे कार्यातून शिकले पाहिजे कि शेती हा दीर्घकाळ चालणारा व्यवसाय असून तो फक्त अन्न सुरक्षिततेचा भाग नसून सांस्कृतिक सुरक्षिततेचा पाया आहे.

कृषी संस्कृती हि सर्व संस्कृतीची जननी आहे.जेव्हा आम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात जात असू तेव्हा तिथे लोकगीत ऐकायला मिळत.बहूतेक लोकांना शेतीचे व्यापक सांस्कृतिक,जीवनविषयक महत्व लक्षात येत नाही.डॉ.पंजाबराव देशमुखांनी हे महत्व ओळखले.कृषी हे जीवन व जीवनमानाचा आधारस्तंभ आहेत.

डॉ.पंजाबराव देशमुखांनसोबत आपल्या काही व्यक्तिगत आठवणी?

डॉ.एम.एस.स्वामिनाथन : डॉ.पंजाबराव देशमुखांनसोबत कार्य केल्याच्या स्मृती माझ्या मनात आहेत.तुमच्याशी बोलतांना माझे मन १९५८-५९ सालामध्ये गेले.विशेषत: जागतिक कृषी प्रदर्शनाच्या आठवणी ताज्या आहेत.त्यांनी कृषी विकासासाठी योग्य वेळी योग्य कार्यक्रम राबविलेत.पंजाबराव देशमुख हे ध्येयवादी होते.

डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२० व्या जयंतीला, दि.२७ डिसेंबर ला अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थ्येच्या जयंती कार्यक्रमामध्ये सदर मुलाखत प्रक्षेपित होणार आहे.

मुलाखत कर्ते :

डॉ.रमेश अंधारे माजी प्राचार्य श्री शिवाजी कला व वाणिज्य    महाविद्यालय,अमरावती

डॉ.महेंद्र.वि.मेटे,ग्रंथपाल श्री श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय,अमरावती

metemahendra@gmail.com 9421739996

 

No comments:

Post a Comment