Sunday, 8 May 2022
डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख लिखित "धर्माचा वैदिक साहित्यातील उगम आणि विकास" प्रबंधाचे जागतिक परीक्षण
डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख लिखित "धर्माचा वैदिक साहित्यातील उगम आणि विकास" प्रबंधाचे जागतिक परीक्षण
डॉ.पंजाबराव देशमुख यांची ओळख देशामध्ये फक्त केंद्रीय कृषी मंत्री म्हणून आहेत.परंतु त्यांनी ऑक्सफोर्ड विश्वविद्यालयामध्ये डी .फील करीत केलेल्या संशोधनाची ओळख फारच कमी विद्वान व विद्यापीठांना आहे असे दिसून येते. सदर लेखामध्ये त्यांच्या संशोधन विषयक प्रबंधाचे जागतीक स्तरावर झालेले परीक्षण अभ्यासण्याचा प्रयन्त करण्यात आलेला आहे. भारताचे कृषिमंत्री ,संविधान सभेचे सदस्य व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी ऑक्सफोर्ड विश्वविद्यालय मधून 1925 ‘धर्माचा वैदिक साहित्यातील उगम आणि विकास’ या विषयावर डॉक्टरेट प्राप्त केली ज्ञानाच्या क्षेत्रांमध्ये धर्म तत्वज्ञान तर्कशास्त्र या विषयांमध्ये योगदान देणारे तत्त्ववेत्ते समाजाला नवी दिशा देतात हा जगाचा इतिहास आहे.
तत्त्ववेत्त्यांनी आपल्या शोधक वृत्ती चा उपयोग जग समजून घेण्यासाठी केला त्यामध्ये शास्त्रज्ञ तत्त्ववेत्ते व साहित्यिक यांचा समावेश आहे म्हणून तत्त्ववेत्ता काल मार्क्स म्हणतो "जगाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न अनेक तत्त्ववेत्त्यांनी केला पण प्रश्न आहे ते बदलविण्याचा". व र्हाडातील भूमिपुत्र व देशाचे प्रथम केंद्रीय कृषिमंत्री डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब यांनी जग बदल विण्याच्या दृष्टीने विश्वाचा अभ्यास केला व त्याचा परिपाक म्हणजे त्यांनी डी फील करता निवडलेला विषय "धर्माचा वैदिक साहित्यात उदय आणि विकास "
या विषयावर भाऊसाहेबांनी आपला प्रबंध ऑक्सफोर्ड विश्वविद्यालयला सादर केला . 25 जानेवारी 1925 ला ऑक्सफोर्ड विश्वविद्यालयाने डी फील पदवी देऊन भाऊ साहेबांना सन्मानित केले. त्यानंतर आठ वर्षांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाने तो प्रबंध ग्रंथ स्वरूपात प्रकाशित केला. या ग्रंथाने जागतिक स्तरावरील तत्वज्ञानाच्या क्षेत्रात मोठी छाप उमटविली. जगातील अग्रणी विद्यापीठातील विद्वानांनी त्यांचे ग्रंथ परीक्षणे लिहिली. त्यामध्ये अमेरिकेतील शिकागो विद्यापीठ, रॉयल सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन एण्ड आयरलैंड, अमेरिकन ओरिएंटल सोसायटी, न्यूयॉर्क येथील फोरदम संशोधन विश्वविद्यालय, कैंब्रिज विश्वविद्यालय यांचा समावेश आहे . जागतिक स्तरावर या ग्रंथावर पाच परिक्षणे प्रकाशित झालेले आहेत . जागतिक विद्वत समाजामध्ये संशोधन प्रकाशन व त्यावरील परिक्षणे ही संशोधन परिपूर्ण तेची प्रक्रिया मानली जाते. भाऊसाहेबांच्या प्रबंधावर आलेल्या चार ग्रंथ परीक्षणांचा अनुवाद गोवा विद्यापीठाचे माजी इंग्रज इंग्रजी विभाग प्रमुख व आंतराष्ट्रीय कीर्तीचे तुलना कार लेखक प्राध्यापक डॉ. आनंद पाटील यांनी भाऊसाहेबांच्या प्रबंधाच्या अनुवादित मराठी ग्रंथामध्ये केला आहे.
भाऊसाहेबांनी सदर प्रबंध डॉक्टरेट पदवी करता सादर केल्यानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस ने 1933 ला प्रकाशित केला. सदर ग्रंथ प्रकाशित झाल्याबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरील अग्रणी नियतकालिकांमध्ये त्यावर परीक्षण आलीत.वरील प्रबंधाचे प्रथम ग्रंथ परीक्षण शिकागो विद्यापीठाने ‘जर्नल ऑफ रिलिजन’ मध्ये 1935 सालीच प्रकाशित झाले . प्रोफेसर जी.बोब्रिनस्कॉय यांनी ग्रंथाचे परीक्षण केले. त्यांनी सदर परीक्षणामध्ये स्पष्टपणे नमूद केले की हा ग्रंथ म्हणजे साराभूत लेखन आहे आणि लेखकाचा दृष्टीकोन नेहमीच न्याय व यथोचित टिकात्मक राहिला आहे. भाऊसाहेबांच्या शोधप्रबंध बाबत सदर परीक्षण त्यांच्या संशोधनाबद्दल असलेल्या दृष्टिकोन बदल मत व्यक्त करते.
दुसरे परीक्षण एडिनबर्ग विद्यापीठाचे प्रोफेसर ए बी किथ यांनी जुलै 1935 साली केले.सदर ग्रंथ परीक्षण "द जर्नल ऑफ द रॉयल सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अंड आयर्लंड" मध्ये प्रकाशित झाले. प्रोफेसर ए बी किथ भाऊसाहेबांचे एडिनबर्ग विद्यापीठात असताना शिक्षक व मार्गदर्शक राहिले आहेत. भाऊसाहेबांचे डी फील संशोधन कार्य संस्कृतचे गाढे अभ्यासक ऑक्सफर्ड विश्वविद्यालयाचे प्रोफेसर मॅक्डोनेल हे मार्गदर्शक होते. प्रोफेसर ए बी किथ त्यांनी भाऊसाहेबांच्या ग्रंथाला प्रस्तावना सुद्धा दिली आहे. त्यामध्ये त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की या ग्रंथाचे दोन्ही देशात भारत व इंग्लंड मध्ये स्वागत होईल. सदर संशोधनामध्ये लेखकाचा दृष्टीकोण समतोल असल्याचे निरीक्षण प्रोफेसर की नमूद करतात. भाऊसाहेबांच्या प्रबंधाचा मुळ विषय मूळ भारतीय धर्माचा उदय आणि विकास आणि आंतरसंबंध हा होता. त्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे तो संक्षिप्त करण्यात आला होता . परंतु भाऊसाहेबांचा दृष्टीकोण विषय निवडीमुळे स्पष्ट होतो. धर्माचा अभ्यास करताना इंडो-युरोपियन, इंडो-इराणी आणि वैदिक धर्माचा अंतर संबंध शोधण्याचा होता. धर्मविषयक साहित्याची शास्त्रीय मांडणी करणारे भाऊसाहेब बहुतेक पहिले भारतीय असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. प्रोफेसर ए.बी. किथ यांनी भाऊसाहेबांचे हे संशोधन सखोल अभ्यासकांना नवीन ऊर्जा देणारे असल्याचे मत व्यक्त केले. सदर संशोधन वैदिक धर्माच्या समस्यांचा अभ्यासासाठी महत्त्वाची रूपरेषा सिद्ध होईल असे मत प्रोफेसर ए.बी. किथ यांनी व्यक्त केले.
तिसरे ग्रंथ परीक्षण फ्रांकलीन एडगर्टन यांनी जर्नल ऑफ अमेरिकन ओरिएंटल सोसायटी या नियतकालिकांमध्ये सप्टेंबर 1935 साली केले. त्यांनी सदर शोध प्रबंधाचा चिकित्सक आढावा घेतला.1924 सपूर्ण झालेला प्रबंध नऊ वर्षानंतर प्रकाशित होताना अद्यावत व्हायला हवा असे मत त्यांनी व्यक्त केले.परंतु भाऊसाहेबांनी ग्रंथाच्या प्रस्तावनेत मध्येच त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे व आवश्यक असलेल्या संदर्भ ग्रंथांच्या अनुपलब्धतेमुळे ग्रंथातील संदर्भांची तपासणी राहून गेल्याचे नमूद केले आहे
चौथे परीक्षण एफ. ओटो .श्रदेर यांनी "फिलॉसॉफी" या नियतकालिकांमध्ये सप्टेंबर 1935 साली केले. प्राचीन भारतातील जीवनाचा जादूच्या दृष्टिकोनातून वेध घेणारा एकमेव ग्रंथ असल्याचे ते नमूद करतात. परीक्षण करताना परीक्षक संशोधकाचे मत लक्षात घेऊन खालील मत व्यक्त करतो .लेखक म्हणतो "जादू हा स्थायिक झालेल्या , त्रास नसलेल्या आणि अलग पडलेल्या जीवनाचा शाप आहे. अशा प्रकारचे हे जीवन मोहनजोदारो चा अवशेषांनी दाखविले आहे. इंडस दरीतील आर्य पूर्व शहरी लोकांचे कित्येक शतकापूर्वीचे ते जीवन होते. याखेरीज मेसोपोटेमिया यामधील जादूच्या केंद्राची त्याचे संबंध होते .त्यांच्या मते सदर ग्रंथ हा विचार प्रमाण असून संदर्भ ग्रंथावर आधारित मौल्यवान ग्रंथ आहे.
पाचवे परीक्षण फर्डिनांड फेबरस्ट्रॉ यांनी “थॉट”"या न्यूयॉर्कमधील फोरदम संशोधन विश्वविद्यालयाच्या नियतकालिकांमध्ये 1936 साली प्रकाशित केले. ग्रंथ परिक्षणाची सुरुवातच लेखक अशी करतो "This is a scholarly and within certain limits, a fearless book” . लेखक पुढे असे म्हणतो की शास्त्रीय संशोधन कार्यामध्ये निर्भयता आवश्यक आहे व ती लेखकांमध्ये दिसून येते .तुलनात्मक धर्माचा अभ्यास करणारे खूप संशोधने आहेत पण हे संशोधन प्रथमतः मूलगामी आहेत.
गुगल स्कॉलर या डेटाबेस वरून लक्षात येते की विविध देशातील या विषयावरील लेखनामध्ये भाऊसाहेबांच्या ग्रंथांचा संदर्भ घेण्यात आला. त्या संशोधकांनी त्याचे संदर्भ दिले आहेत प्रख्यात लेखक R.Sशर्मा यांनी त्यांच्या “Aspect of political ideas and institution in ancient India” या ग्रंथात भाऊसाहेबांच्या संशोधनाचा संदर्भ देऊन मांडणी केलेली दिसून येते. तसेच त्यांच्या दुसऱ्या ग्रंथात “Material culture and social formation in India” या ग्रंथात भाऊसाहेबांच्या संशोधनावर मांडणी केलेली आहे. डेक्कन महाविद्यालयाचे माजी कुलगुरू डॉ.एच .जी.रानडे यांनी त्यांच्या लेखात SUN-GOD AND HIS ASSOCIATES IN THE RIGVEDA भाऊसाहेबांच्या प्रबंधाचा संदर्भ घेऊन विषयचा विस्तार केला. त्यामध्ये सुरुवातीलाच ते असे म्हणतात कि ऋग्वेद मधील सूर्य कुळातील देवांचा उल्लेख फार कमी संशॊधनामध्ये झाला .डॉ.पंजाबराव देशमुख यांनी त्यांच्या प्रबंधामध्ये देवांचे वर्गीकरण दिले आहेत. तीन प्रकारामध्ये त्यांचे वर्गीकरण त्यांनी केले.एक. स्वर्गातील देव २. वातावरणातील देव ३. पृथीतलावरील देव. डॉ.रानडे यांनी भाऊसाहेबांच्या या मांडणीवर पुढील संशोधन केल्याचे दिसून येते
भाऊसाहेबांनी अतिशय मूलभूत अशी मांडणी धर्म व्यवस्थेच्या उत्पत्तीच्या व विकासाच्या संदर्भात केलेली दिसून येते. परंतु नंतरच्या काळामध्ये भारतीय विद्वानांनी त्यावर मत व्यक्त केलेले दिसून येत नाही .
ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर सदर संशोधनाची दखल घेण्यात आली त्याप्रमाणे भारतीय विद्वान कमी पडल्याचे दिसून येते. सदर संशोधन ग्रंथ भारतीय संस्कृती तत्त्वज्ञान धर्म या विषयावर अभ्यास व संशोधन न करता उपयुक्त असून विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश व्हायला हवा. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झालेले ग्रंथ परीक्षण मिळवणे यासारखा दुसरा आनंद नाही सदर परीक्षण JSTOR या आंतरराष्ट्रीय डेटाबेस मधून प्राप्त करता आले.
References:
1.Review Reviewed Work(s): The Origin and Development of Religion in Vedic Literature by P. S. Deshmukh Review by: G. Bobrinskoy Source: The Journal of Religion , Apr., 1935, Vol. 15, No. 2 (Apr., 1935), p. 244 Published by: The University of Chicago Press Stable URL: https://www.jstor.org/stable/1196405
2.Review Reviewed Work(s): The Origin and Development of Religion in Vedic Literature by P. S. Deshmukh Review by: A. Berriedale Keith Source: The Journal of the Royal Asiatic Society of Great Britain and Ireland , Jul., 1935, No. 3 (Jul., 1935), p. 537 Published by: Cambridge University Press Stable URL: https://www.jstor.org/stable/25201193
3.Review Reviewed Work(s): The Origin and Development of Religion in Vedic Literature by P. S. Deshmukh Review by: F. Otto Schrader Source: Philosophy , Oct., 1935, Vol. 10, No. 40 (Oct., 1935), pp. 496-497 Published by: Cambridge University Press on behalf of Royal Institute of Philosophy Stable URL: https://www.jstor.org/stable/3746706
4.Review Reviewed Work(s): The Origin and Development of Religion in Vedic Literature by P. S. Deshmukh Review by: Franklin Edgerton Source: Journal of the American Oriental Society , Sep., 1935, Vol. 55, No. 3 (Sep., 1935), pp. 319-323 Published by: American Oriental Society Stable URL: https://www.jstor.org/stable/594837
5. Review Reviewed Work(s): The Origin and Development of Religion in Vedic Literature by P. S. Deshmukh Review by: Ferdinand W. Haberstroh:Thought: Fordham University Quarterly Volume 10, Issue 4, March 1936 Pages 677-681
6.Rande,H.G (1974) Sun-God and his associates in the Rigveda , Bulletin of the Deccan College Post-Graduate and Research Institute, Vol. 34, No. 1/4 (1974), pp. 143-146 URL: https://www.jstor.org/stable/42931026 Accessed: 23-03-2022 14:49 UTC
7.पाटील आनंद (२०१८) अनुवाद व संपादन :डॉ.पंजाबराव शामराव देशमुख :धर्माचा वैदिक वाड्यमयातील उदय आणि विकास ,आनंद ग्रंथसागर ,कोल्हापूर
8. मोहित,वीर उत्तमराव (२०२०) जागतिक कृषक क्रांतीचा विधाता लोकनेता डॉ.पंजाबराव देशमुख ,मराठा विज्ञान मंदिर अमरावती
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment